मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे जवळपास २५ वर्षांपूर्वी जि. प. जलसंधारण विभागांतर्गत सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आणि परिसरात रबीचे क्षेत्रही वाढले. शेतकऱ्यांना २१ वर्षे मुबलक पाणी या तलावातून मिळाले. परंतु, गेल्या चार वर्षांपूर्वी या तलावाच्या भिंतीला तडे गेले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरुन तलाव हिवाळ्यातच कोरडा पडू लागला आणि तलावाच्या भरवशावर पेरणी केलेली गहू, हरभरा पिके संकटात सापडू लागली. या प्रकारामुळे चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सतत आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यासंदर्भात जि. प. जलसंधारण विभागाच्या मानोरा शाखेकडे निवेदन सादर करून दुरुस्तीची मागणीही वारंवार केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे यंदाही हिवाळ्यातच हा प्रकल्प आटला आणि या तलावाच्या भरवशावर पेरलेली शेकडो एकरातील रबी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. लोकमतने वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर जि. प. सदस्या विनादेवी जयस्वाल यांनी या तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडे ५० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव दिला आहे.
---------------------
जि. प. अध्यक्षांकडून प्रस्तावाला रेटा
जामदरा येथील सिंचन तलाव लिकेजमुळे आटत असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेत जि. प. सदस्या विनादेवी जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव सादर केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही या प्रस्तावाला समर्थन दर्शविताना निधी मंजुरीसाठी रेटा लावण्याची तयारी केली आहे.
===Photopath===
310121\31wsm_1_31012021_35.jpg
===Caption===
जामदरा तलाव दुरुस्तीसाठी ५० लाखांचा प्रस्ताव