वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमुळे सिंचन क्षमता वाढली असून, विजेअभावी सिंचनात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून कोकलगाव येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे सर्वेक्षण महावितरणच्या चमूने केले. वाशिम तालुक्यातील कोकलगाव, जुमडा परिसरात पैनगंगा नदीवर बॅरेज करण्यात आल्याने सिंचन क्षमतेत कमालिची वाढ झाली. नदीकाठावरील शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतीतून अपेक्षित उत्पादन घेण्यातील अडथळे दूर झाले. पाणी असूनही अनेक शेतकर्यांना सलग व पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने सिंचन करण्यात अडथळे येतात. गत सहा-सात वर्षांंपासून कोकलगाव परिसरातील सर्वसामान्य जनता व शेतकरी अनियमित वीजपुरवठय़ाला वैतागले आहेत. पाण्याची मुबलक सुविधा असतानाही केवळ सलग वीजपुरवठा नसल्याने भरघोस उत्पादनापासून शेतकर्यांना वंचित राहावे लागत आहे. दीड वर्षांंपूर्वी शेतकर्यांनी जिल्हा परिषद सभापती चक्रधर गोटे यांच्याकडे ३३ केव्ही वीज उपकेंद्राची मागणी लावून धरली. गोटे यांनी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक व आमदार लखन मलिक यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकार्यांकडे निवेदन सादर करून ३३ केव्ही वीज उपकेंद्राची मागणी केली. मध्यंतरी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांनादेखील निवेदन दिले. बॅरेज परिसरात ३३ केव्ही वीज उपकेंद्राची कशी आवश्यकता आहे, हे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या. कोकलगाव ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिल्याने सुरुवातीला जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सर्वेक्षण करून वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे ३३ केव्ही उपकेंद्राबाबत आशा पल्लवित झाल्या असून, सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास शेकडो शेतकर्यांनी व्यक्त केला.
३३ केव्ही उपकेंद्राचे सर्वेक्षण
By admin | Updated: February 29, 2016 02:19 IST