मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील ९ अंगणवाडी सेविकांचे व १९ मदतनीसची पदे तसेच २ मिनी अंगणवाडी कार्यकर्तीची पदे मागील दोन तीन वर्षापासुन रिक्त आहे. परिणामी, अंगणवाडीच्या माध्यमातुन राबविल्या जाणार्या विविध योजनेचे तिन तेरा वाजत आहे ग्रामीण तथा शहरी भागातील बालकांना योग्य पोषण आहार मिळावा, याकरिता शासनाचे वतीने प्रयत्न केले जाते परंतु रिक्त पदांमुळे या प्रयत्नांना हारताळ फासल्या जात आहे. त्यामुळे अंगणवाडीचा कारभार ढेपाळला असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. ज्या अंगणवाडीच्या जागा रिक्त आहेत त्याठिकाणी इतर अंगणवाडीच्या सेविकाकडे प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन ठिकाणचा कारभार पाहतांना योग्य पध्दतीने पोषण आहार देतांना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिक्त जागा भरण्याची प्रक्रीया २0१0-११ नंतर राबविण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. अजगांव, पिंपळखुटा, कोळंबी, खापरी कान्होबा, रहीत, शिवनी रोड, लाठी, जनुना खुर्द, मसोला बु. या गावात अंगणवाडी सेविकांची व कोळंबी, खापरी, रहीत, चेहेल, हिसई, वाडा, कासोळा, दस्तापुर, जोगलदरी, कोठारी, पारवा, जनुना खुर्द, शेंदुरजना, तर्हाळा २, वनोजा २, आसेगांव व सायखेडा येथे मदतनिसची तसेच खरबी, मजलापुर या दोन गावात मिनी कार्यकर्तीची पदे रिक्त आहे. गत कित्येक महिन्यांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी कार्यकर्तीची रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष दिले नाही, हे वास्तव आहे. रिक्त पदांमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेळेवर योग्य त्या सुविधा पुरविणे कार्यरत कर्मचार्यांना तारेवरची कसरत ठरत आहे. नियमित पद आणि पदभार सांभाळणे त्या-त्या कर्मचार्यांना डोकेदुखी ठरत आहे. चिमुकल्यांना योग्य त्या सेवा आणि अंगणवाडीच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
अंगणवाडी कर्मचार्यांची ३0 पदे रिक्त
By admin | Updated: August 19, 2014 23:47 IST