कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यात प्रारंभी कडेकोट संचारबंदी लागू करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात येत गेली, तसतसे त्यातून शिथिलता देण्यात आली. यादरम्यान अनेकांनी नियमांचे पालन केले; मात्र काही लोकांनी नियमबाह्य वर्तन केल्याने पोलिसांकडून अशा लोकांवर कारवाई करण्यात आली. भादंविचे कलम १८८ अन्वये दाखल झालेले ते गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.
...................
लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे - ३१४८
विनापरवानगी प्रवास करणे - २४३
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन - २,९०५
.......................
जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचे सर्वाधिक गुन्हे
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लावून जमावबंदी आदेश लागू केला. असे असताना अनेकांनी हा नियम पायदळी तुडविला.
जिल्हाभरातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याउपरही कोणालास न जुमानता काही लोकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
नियमबाह्य वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाभरातील २९०५ लोकांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले. हे गुन्हे आता मागे घेतले जाणार असल्याची माहिती आहे; मात्र यासंबंधी पोलिसांना अद्यापपर्यंत आदेश मिळालेले नाहीत.
...............
गुन्हे परत कसे घेतले जातात?
कोरोना संकट काळात लॉकडाऊन व संचारबंदी लावूनही अनेकांनी नियम पायदळी तुडविले. अशा लोकांवर पोलिसांकडून कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार तथा न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे. तशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. कायद्याच्या चौकटीत बसून हे गुन्हे परत घेतले जाणार आहेत, असेही देशमुख यांनी टि्वटरवर सांगितले होते.
.....................
कोट :
लॉकडाऊन काळात भादंविचे कलम १८८ अन्वये ३१४८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घेण्यासंबंधी शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. असे काही आदेश आल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम