कारंजा: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत मोफत प्रवेश देण्याचा शासनाचा ह्यनियमह्ण बासनात गुंडाळून शहरातील काही शाळांनी स्वत:च्या नियमावलीची अंमलबजावणी केल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे किती शाळांनी २५ टक्के प्रवेशाचा कोटा पूर्ण केला, याचा लेखाजोखाच कारंजा येथील प्राथमिक शिक्षण विभागाकडे नाही. परिणामी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असणारी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सध्यातरी गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येते.शिक्षणाच्या (राईट टु एज्युकेशन-आरटीई) अधिकाराने तालुक्यातील आठ शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गातील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात किंवा जेथे नर्सरी, केजी-वन, केजी-टु आदी पूर्व प्राथमिक शाळेचा वर्ग पहिल्या वर्गाला जोडलेला असेल, त्या शाळेत नर्सरीमध्ये २५ टक्के प्रवेश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेबाबत ह्यलोकमतह्णने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, शिक्षण विभागाकडे याबाबत अजून माहितीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. २५ टक्के राखीव कोट्यानुसार प्रवेश प्रक्रिया नियमानुसार पूर्ण न करणार्या शाळेवर कडक कारवाई करू अशी प्रतिक्रिया गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी दिली.कारंजा तालुक्यातील असणार्या शाळेमध्ये शासनाच्या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील व अल्पसंख्यंक समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया माहित व्हावी याकरिता नियमात बसणार्या शाळेंनी प्रचार प्रसार, प्रसिद्धी देणे बंधनकारक आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यापर्यंंत प्रवेश प्रक्रिया काय आहे ही माहित होईल. त्यानुसार तालुक्यातील आरटीईच्या नियमात बसणार्या ८ शाळा व अल्पसंख्याकाच्या ४ शाळा यांनी नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केल्यास तसेच याबाबत कोणत्याही पालकांची नियमाला अनुसरून तक्रार असल्यास कारवाई करू असे गटशिक्षणाधिकारी डाबेराव यांनी सांगितले. तालुक्यात आर.टी.ई.च्या नियमात बसणार्या ८ शाळा आहेत. ज्यामध्ये ब्लू चिप कॉन्व्हेट, न्यू गोविंद कॉन्व्हेट कारंजा, इंडियन इंग्रजी शाळा, सर्मथ शाळा कामरगाव, तारांगण शाळा धनज, विद्याभारती, प्राथमिक शाळा कारंजा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा कारंजा, विद्यारंभ प्राथमिक शाळा तर अल्पसंख्यंक समाजाच्या जे.डी.चवरे विद्यामंदिर, जे.सी. हायस्कूल, एम.बी.हायस्कूल, कंकूबाई कन्या शाळा, शोभनाताई चवरे हायस्कूल कारंजा आदी शाळा आहेत. या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी सभा बोलावून शासनाच्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा याबाबत शिक्षण विभागाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेचे पालन शाळा प्रशासनाने न केल्यास त्यांच्या शाळेची प्रवेश प्रक्रिया तपासणी अंती नियमानुसार किंवा प्रसिद्धी देऊन न झाल्यास त्या शाळेवर कारवाई करण्याचा इशारा कारंजा पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे.
२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे रेकॉर्डच नाही
By admin | Updated: July 13, 2014 22:35 IST