वाशिम : हिंगोली रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या बियाणे प्रक्रिया युनिटमधून तब्बल २३ लाख रुपयांचे सोयाबीन व हरभर्याचे बियाणे अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना बुधवारला घडली असून, गुरुवारला रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. वाशिम ते हिंगोली महामार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर महाबीजचे बीज प्रक्रिया युनिट आहे. येथे बियाण्यांवर प्रक्रिया करून साठवणूक केली जाते. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून बांधून ठेवले. त्यानंतर गोदामामधील १८0 क्विंटल सोयाबीन व २१0 क्विंटल हरभर्याचे बियाणे ट्रकमध्ये भरून पसार झाले. सदर घटना बुधवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कांबळे, ठाणेदार विनायक जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नीळकंठराव पवार यांच्या फिर्यादीहून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी या घटनेतील संशयित म्हणून दोघांना अटक केली असून त्यांची नावे राजू वसंता मुळे (रा. वाशिम) व वसंता नारायण जाधव (रा. धुमका ता.जि.वाशिम) अशी आहेत. या दोघांना न्यायालयाने २३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास वाशिम ग्रामीणचे ठाणेदार विनायक जाधव करीत आहेत.
गोदामामधून २३ लाखांचे बियाणे लंपास
By admin | Updated: May 20, 2016 01:50 IST