मालेगाव : गेल्या वर्षभरात मालेगाव तालुक्यात २१८२ जणांना कोरोना संसर्ग झाला असून, यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक दिवस मालेगावकरांनी कोरोनाला जिल्ह्याच्या वेशीवर रोखले होते. मात्र, ४ मार्च २०२० रोजी तालुक्यातील पहिल्या रुग्णाची नोंद झाली. आज वर्षभरात २१८२ जण कोरोनाबाधित झाले. त्यातील १ हजार ७३० जणांनी कोरोनावर मातही केली. सध्या मात्र कोरोनाचा उद्रेक वाढलेला असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक घातक असून या लाटेचे रौद्ररूप सध्या मालेगावकर सोसत आहेत. पहिल्या लॉकडाऊनवेळी कामगार, कष्टकऱ्यांचे मोठे हाल झाले. मध्यंतरीच्या काळात रुग्णसंख्या घटली होती. मात्र, कोरोना गेला अशा थाटात नागरिकांनी आपले वर्तन सुरू केले. लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली. त्यातच नागरिकांनी मास्कसह सॅनिटायझरचाही वापर कमी केला. त्यामुळे दुसरी लाट अधिक मोठी झाली. पहिल्या लाटेत कुटुंबातील एखादा बाधित आढळत होता. मात्र, आता काही ठिकाणी कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य बाधित होत आहेत. नागरिकांनी आता दक्षता घेण्याची गरज असून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करायला हवे. गतवर्षभरात उपचारादरम्यान तालुक्यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात ४३४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इनबॉक्स
१७३० जणांनी केली कोरोनावर मात
रुग्ण संख्या आणि मृत्यूचे आकडे डोळे फिरवणारे आहेत. मात्र, त्यातही दिलासा देणारी बाब म्हणजे दररोज कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २१८२ पैकी १७३० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
०
मालेगावात कधी येणार सेवासुविधा?
एक वर्षाच्या पूर्वी कोरोना आला. मात्र, अद्यापही तालुक्यात आरोग्यविषयक सेवा सुविधा आल्या नाहीत. याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष घातले तर होऊ शकेल. मात्र, पुढाकार कोण घेणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.