वाशिम : कोरोना संकटकाळात जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले समर्पित कोविड रुग्णालय, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा करण्यासाठी २६३ जणांना प्रत्येकी तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर आरोग्य विभागात नोकरी मिळाली; मात्र कुठलीच पूर्वसूचना न देता त्यातील १६० जणांचा करार १८ ऑगस्ट रोजी संपुष्टात आणून त्यांना बेरोजगार करण्यात आले. हा अन्याय असून एकाच क्षणात नोकरी गेल्याने संबंधित कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने ४० हजारांवर पोहोचली. या काळात आरोग्य विभागाकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांची आबाळ होणार, अशी शक्यता गृहीत धरून प्रत्येकी तीन महिन्यांचा करार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांनीही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता इमानेइतबारे सेवा दिली; मात्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होताच डीसीएस, डीसीएचसी, सीसीसी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचे आदेश काढण्यात आले. त्या अनुषंगाने १८ ऑगस्ट रोजी १६० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले; मात्र कुठलीच पूर्वसूचना न देता एकाच क्षणात शासनाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असून, याप्रती जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू, अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली.
..................
कार्यमुक्त कर्मचारी म्हणतात, ‘गरज सरो, वैद्य मरो’ची भूमिका
कोरोना संकटकाळात कंत्राटी तत्त्वावर नोकरी मिळाल्याने पोटापाण्याची सोय झाली होती. आम्ही लोकांनीही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता इमानेइतबारे कोरोनाबाधितांची सेवा केली. मात्र आरोग्य विभागाने कुठलीही पूर्वसूचना न देता कार्यमुक्त केले. ‘गरज सरो, वैद्य मरो’ची ही भूमिका संतापजनक आहे.
- पुष्पक राठोड
....................
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये संसर्गाने बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. जो-तो कोरोनाच्या भीतीने स्वत:ला जपत होता. अशा संकटकाळातही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी सर्वस्व अर्पण केले; मात्र आरोग्य विभागाने कार्यमुक्त करताना कुठलाच सारासार विचार केला नाही.
- सचिन सुतार
............................
कंत्राटी तत्त्वावर घेतलेले एकूण कर्मचारी - २६३
कार्यमुक्त केलेले कर्मचारी - १६०
...............
कोट :
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. सध्या डीसीएस, डीसीएचसी, सीसीसी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकही बाधित रुग्ण उपचारार्थ भरती नाही. त्यामुळे १६० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. भविष्यात गरज भासल्यास याच लोकांचा विचार करून त्यांना पुन्हा रुजू करण्यात येईल.
- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम