वाशिम : मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच शेतकर्यांवर आलेल्या संकटामुळे शेतकरी पार खचून गेला. जिल्हय़ात ९, १0 व ११ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील ८0 हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. अंतिम अहवालात मात्र गारपिटीमुळे ५ हजार १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये नुकसानग्रस्त १५७८५ शेतकर्यांचा समावेश आहे.जिल्हय़ात ९ व १0 मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाने सर्वेक्षण व पंचनामे करून ३२ हजाराच्यावर हेक्क्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाजही वर्तविला होता व तसा अहवालही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता; मात्र या नुकसानामध्ये ५0 टक्केच्यावर नुकसान झालेले क्षेत्र केवळ ५१३१ असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्यावतिने कळविण्यात आले आहे. शासनाने गारपीटग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांना अद्याप मदत जाहीर केली नसली तरी मदत मात्र ५0 टक्केच्यावर नुकसान झालेल्या शेतकर्यांनाच मिळणार आहे. इतर शेतकर्यांचे ५0 टक्केच्या आत नुकसान असल्याने मात्र मिळणार्या मदतीचा काहीही फायदा होणार नाही. जिल्हय़ात मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये गहू या पिकाचे वाशिम तालुक्यात १२0 हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यात २९00 हेक्टर, मानोरा तालुक्यात ३१९0 हेक्टर, कारंजा तालुक्यात २३९0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच हरभरा पिकाचे वाशिम तालुक्यात २५0 हेक्टर, मंगरूळपीर २५00 हेक्टर, मानोरा २५0१ हेक्टर व कारंजा तालुक्यात २५१0 हेक्टर पिकांचे नुकसान तर फळ पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील ३00 हेक्टरवरील तर इतर पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील २00 व कारंजा तालुक्यातील ४३७ हेक्टरवरील असे एकूण जिल्हय़ात गव्हाचे ८६00, हरभरा ७७६१ , फळपिकाचे ३00 तर इतर ६३७ असे १७२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. तर ९ मार्च रोजी झालेल्या गारपीट भागाची पाहणी सुरू असतानाच ११ मार्च रोजी जिल्हय़ातील अनसिंगसह मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव, पिंपळगाव, शिवणी, चिंचोलीसह आसेगाव परिसरातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये जवळपास १५000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळ पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. जिल्हय़ात ९ व १0 मार्च रोजी १७२९८ हेक्टरवरील व ११ मार्च रोजी १५000 हेक्टरवरील असे एकूण ३२२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार केल्या गेला; मात्र यामधील ५0 टक्केच्यावर नुकसान झालेले क्षेत्र केवळ ५१३१.७0 हेक्टर इतकेच असल्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे; तसेच डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे ४२३८ तर फेब्रुवारी २0१५ मध्ये १२.६0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
गारपिटीमुळे १५ हजार शेतक-यांचे नुकसान
By admin | Updated: April 2, 2015 02:25 IST