लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर झाल्याने शेतजमिनीमधील सेंद्रीय कर्ब जवळपास नष्ट झाल्याने उत्पादन क्षमता घटली आहे. ही बाब लक्षात घेत शेतजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट अर्थात लघु प्रयोगशाळा निर्मितीची तयारी केली आहे. शेतकरी गटांना हे ऑर्गनिक युनिट दिले जाणार आहेत. शेतजमितीन सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी राबविला जाणारा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आणि उपक्रम ठरणार आहे.जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारण १२ ते १८ टक्के सेंद्रीय कर्ब असलेली शेतजमीन सुपिक मानली जाते. सेंद्रीय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत राहण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते. तथापि, जिल्ह्यात गत काही वर्षांत शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांसह रासायनिक कीटकनाशकाचा वारेमाप वापर होत आहे. त्यामुळे जमिनीतील मूळ सेंद्रीय कर्बांचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ही प्रक्रिया पुढे, अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यातील शेती नापिक होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतजमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट स्थापन करण्याची योजना आखली आहे. जिल्ह्यातील १०० शेतकरी गटांना हे ऑर्गनिक युनिट दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
रासायनिक खताच्या वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीची सुपिकता घटली आहे. त्यामुळे सेंद्रीय कर्ब वाढविण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यासाठी ऑर्गनिक युनिट अर्थात सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी लघु प्रयोगशाळा उभारण्याची तयारी आहे. जिल्ह्यातील शंभर शेतकरी गटांना या प्रयोगशाळा दिल्या जातील. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नीती आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.-शंकर तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी