बोर्डी : अवैध रेती उपसा, पाणथळ जमिनीवर भराव, सीआरझेडचे खुलेआम उल्लंघन आणि वृक्षतोड या द्वारे पर्यावरणाची राखरांगोळी सुरू असून त्याला प्र्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याची टीका डहाणूतील पर्यावरण प्रेमिनी जागतिक वसुंधरा दिनी केली आहे. १९९१ च्या नोटिफिकेशनद्वारे अस्तीत्वात आलेल्या डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचा पर्यावरण संरक्षणात महत्वाचा वाटा आहे. मात्र ते हटविण्याची मागणी राजकीय पुढारी, धनदांडगे करीत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीमुळे पर्यावरणाची राख रांगोळी सुरू असल्याची भावना स्थानिक पर्यावरणप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. तालुक्याला लाभलेल्या ३५ किमीच्या समुद्रकिनारी दिवसाढवळ्या रेती उपसा केला जातो. पालघर जिल्हा निर्मितीनंतर हे प्रमाण वाढले आहे. सेकंड होमची शहरी मानसिकता आणि हॉटेल व्यवसायाचे पेव फुटल्याने येथील पाणथळ जमिनीवर भराव घालून बांधकामे सुरू असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन घरं व रस्ते पाण्याखाली जातात. तसेच सीआरझेडचे खुलेआम उल्लंघन झाल्याने समुद्राच्या पाण्याने शेती परिसरात झालेल्या शिरकावाने नापिकता वाढली आहे. तर दुसरीकडे वृक्षारोपणाच्या नावाखाली निकामी झाडांची लागवड होत आहे. काही वर्षातच सोसाट्याच्या वाऱ्यात झाडे आडवी होतात. मात्र याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे स्थानिक जैवविविधता धोक्यात आली असून त्याला प्रशासन जबाबदार असल्याची टीका जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्थानिक पर्यावरण प्रेमिनी केली आहे.
डहाणूतील पर्यावरणाचे संरक्षण करणार कोण ?
By admin | Updated: April 24, 2017 23:44 IST