वसई : वसई-विरार शहर महापालिकेचा कारभार सध्या मागील दोन महिन्यांपासून आयुक्तांशिवाय सुरू असून येथील आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार शासनाने पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, मागील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्याने राज्यातील अनेक सनदी अधिकारी वर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या नजीकच्या महापालिकांना नवीन आयुक्त मिळाले आहेत, मात्र मागील दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या आणि दोन हजार कोटी बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेला आयुक्त मिळालेला नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्याचे नगरविकास खाते हे शिवसेनेकडे असून त्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. गुरु वारी नगरविकास खात्याने विविध पालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदांवर काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यात पालघर जिल्हा वगळून केवळ ठाणे जिल्ह्यातील प्रमुख दोन महानगरपालिका असलेल्या मीरा-भार्इंदर व कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी दोघा सनदी अधिकाºयांची बदली केली आहे.
यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी डॉ.व्ही.एन. सूर्यवंशी तर मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तपदी सी.के. डांगे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, वसई-विरारकरांना वाटले होते की, या बदली आदेश निघालेल्या आठ जणांच्या यादीमध्ये वसई-विरार शहर महापालिका आयुक्तपदी कुणाची तरी वर्णी लागेल, परंतु तसे काहीच झालेले नाही. एकंदरीत आयुक्ताविना महापालिका असेच काहीसे चित्र आता या ठिकाणी निर्माण झाले असून मागील दि. ३१ डिसेंबर रोजी पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार हे स्वेच्छानिवृत्त झाले होते.२० जूनला संपणार महापालिकेची मुदतवसई-विरार शहर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक व त्याची मुदत २० जून २०२० रोजी संपत असून साधारणपणे मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या पालिकेच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे साधारण एप्रिल महिन्यात आदर्श आचारसंहिता अस्तित्वात येऊ शकते.