वसई : वसई तालुक्यात पाणी टंचाईचे संकट असताना टँकर लॉबीने त्याचा फायदा उचलायला सुरुवात केलेली असतानाच काही टँकर चालकांनी मानवतावादी दृष्टीकोनातून टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा सुरु केला आहे. तालुक्याती टंचाई पाहता येणाऱ्या महिन्यांत पाण्याकरीता बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. हे लक्षात घेऊन अशा गाव-पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी वसई टँकर युनियन पुढे सरसावली आहे. वसई टँकर युनियनने वसई पूर्वपट्टीतील राजावली व पंचक्रोषीना मोफत पाणी वाटप सुरु केले आहे. राजावली गाव आणि परिसरातील पाड्यांमधील ग्रामस्थांसाठी बोअरवेल व विहिरी हेच नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. परंतु गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने भूजल पातळी कमी झाल्याने बोअरवेल व विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेऊन वसई टँकर युनियनचे अध्यक्ष जावेद मोबीन खान यांच्या अध्यक्षतेखाली युनियन सभासदांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत भीषण पाणी टंचाई व मानवतावादी दृष्टीकोन याची सांगड घालून युनियनने राजावली व पंचक्रोषीतील गावांना पावसाळ्यापर्यंत मोफत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राजावली गाव व त्या अंतर्गत येणाऱ्या पाड्यांना युनियन मार्फत दररोज टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. जावेद खान, संतोष जाधव, संजय पांडे, जगदीश पाटील, सुखविंदर सिंग या टँकर व्यावसायिकांचा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)
टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीवाटप
By admin | Updated: April 1, 2016 03:16 IST