वाडा : वाडा तहसील कार्यालयातील निवासी तहसीलदार व नायब तहसीलदार (महसूल) यांच्यासह अन्य कर्मचारी बसत असलेल्या दालनाचे (दार) दरवाजे बंद करून महसूल विभागाचा कारभार गेल्या पाच दिवसापासून सुरू असून सामान्य नागरीकांना प्रवेशही नाकारला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.येरवी सर्व नागरीकांसाठी खुले असलेले हे दालन गेल्या पाच दिवसापासून अचानक बंद केले आहे. दालनाबाहेर एक शिपाई तैनात करण्यात आला असून कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरीकाला कोणाकडे काम आहे. कोणते काम आहे याची चौकशी केल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. निवासी नायब विठ्ठल गोसावी हे आपल्या दालनाच्या खिडकीतून नागरीकांच्या कामांची चौकशी करतात व नंतरच नागरीकांना आत प्रवेश देण्याच्या सूचना शिपायाला देतात. सर्वसामान्य नागरीकांसाठी खुले असलेले हे कार्यालय निवासी नायब तहसीलदार गोसावी यांनी बंद केल्याने अनेक नागरीकांना वारंवार हेलपाटे मारूनही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून त्यासाठी लागणारे वेगवेगळे दाखले मिळविण्यासाठी संभाव्य उमेदवार तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. विद्यार्थ्यांनाही या लालफितीचा त्रास होत आहे.मात्र तहसिल कार्यालयाच्या या कारभाराने नागरीकांची पुरती कोंडी झाली आहे.यासंदर्भात वाड्याचे तहसिलदार डॉ. संदिप चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कॉल न स्वीकारल्याने संपर्क होवू न शकला नाही. (वार्ताहर)
वाडा नायब तहसीलदारांची मनमानी
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST