वसंत भोईर। लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा हे ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण असूनही येथील रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरला पेलावा लागत आहे. त्यामुळे या व आसपासच्या चार तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे ठरली आहे. येथील रुग्णालयात शहापूर, विक्रमगड मोखाडा आणि भिंवडी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात पुरु ष आणि महिलांसाठी एक कक्ष आहे. पावसामुळे सध्या या रु ग्णालयात ३५० ते ४०० च्या आसपास बाह्यरुग्ण ,तर ४० ते ५० आंतररुग्ण तपासणीसाठी येत आहेत, तर महिन्याकाठी ८० ते ९० प्रसूती होतात; मात्र स्त्रीरोग व भूलतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी गर्भवतींना ठाणे व मुंबई येथील सरकारी रु ग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे त्यांचे हाल होतात. पावसाळा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साथींच्या आजाराचेही रुग्ण येत असल्याने त्यांचा रुग्णालयावर अतिरिक्त भार पडतो. सर्पदंश, विचूदंश, गॅस्ट्रो याच्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. तसेच महामार्गांवर नेहमी अपघात होत असल्याने अपघातग्रस्तांनाही उपचारासाठी याच रुग्णालयात आणले जाते; या रु ग्णालयात ३० खाटाच असल्यामुळे रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत आहेत.या ठिकाणी डॉक्टरांची दोन पदे रिक्त आहेत. पूर्वी डॉक्टरांच्या मदतीला प्रशिक्षणार्थी डॉक्टर होते. आता तेही नसल्याने या रुग्णांचे हाल होत आहे.
वाडा : नागरिकांचे आरोग्य रामभरोसे
By admin | Updated: June 29, 2017 02:40 IST