लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : नगरपंचायतीचा कारभार जानेवारीमध्ये मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या काळात सुरु झाला खरा मात्र ते रोज येणारे मोर्चे, आंदोलने, नागरिकांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीला कंटाळून रजेवर गेल्याने चार महिन्यांपासून या नगरपंचायतीला कुणीही वाली नाही.मुख्याधिकाऱ्यांविनाच कारभार चालविला जात आहे़ याबाबत ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाकडुन तात्पुरत्या स्वरुपात पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे या पदाचा चार्ज सोपविण्यात आला होता मात्र ते देखील त्यांची कामे सोडून येथे येण्यास तयार नसल्याने आता हा कार्यभार जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे समजते मात्र त्यांचाही येथे अजून थांगपत्ता नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे़ थोडयाच दिवसांत शाळा सुरु होणार असल्याने त्यासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे़ मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणासही वेळ नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे़विक्रमगड नगरपंचायतीची लोकसंख्या ८ हजार ३४० असून १७ गाव-पाडयांचा समावेश आहे़ या सर्व पंचक्रोशिचा संपूर्ण कारभार हा याच नगरपंचायतीमार्फत चालतो १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच कारभार सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात असतांनाच आता मुख्याधिकारी देखील गायब झाल्याने नगरपंचायतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे़विदयार्थ्यांना विविध कामांसाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले महत्वाचे दाखल, घरपटटी, अॅसेसमेन्ट उतारा, व इतर कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे़ त्यातच येथील गावपाडयांत केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत हगणदारी मुक्त गाव योजनेतून शौचालये बांधण्याचे काम जोमाने सुरु असून त्यासाठी लागणा-या धनादेशांवर मुख्याधिकाऱ्यांची सही आवश्यक असते, त्यामुळे ही कामे देखील रखडलेली आहेत़ शासनाने ग्रामपंचायत असताना असलेला कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून व नगरपंचायतीला आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करून मगच नगरपंचायतींची स्थापना करणे आवश्यक होते. परंतु ते न करताच नगरपंचायत स्थापन केल्याने ढाँचा बदलण्यापलीकडे काहीही साध्य झालेले नाही.नगरपंचायतीकरीता शासन मान्य मंजूर पदांचा तपशिलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंखेकरीता आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या नियोजन विकास कामांच्यासाठी शासनमान्य मंजूर पदांचामध्ये १) सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८)लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री जोडारी, १२)शिपाई, १३) मुकादम, १४) व्हालमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी सोडून १५ पदांपैकी एकही पदे भरलेले नाही़
विक्रमगडला ४ महिने मुख्याधिकारीच नाही
By admin | Updated: May 22, 2017 01:48 IST