वसई : वसईतील तरुण घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आईवडीलांनी पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, स्वत:हून तो मंगळवारी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतातील बदलामुळे तृतीयपंथीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोचला होता. मात्र, दोन्ही मुले सज्ञान असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून समजूतीने निर्णय घ्या असा सल्ला दिला. अजय पुजारी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. आईवडिल काळजीने त्याचा शोध घेत होते. मंगळवारी रात्री तो पोलीस ठाण्यात काही तृतीयपंथियांसोबत हजर झाला. त्यांच्या सोबत वसईतीलच नवनाथ सावंत हा तरुणही होता. आम्हाला आमचे घर सोडून तृतीय पंथीयांसोबतच रहावयाचे असल्याचे दोघांनीही पोलिसांना सांगितले. नवनाथने तर आपले नाव बदलून नव्या केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आमच्यातला हा बदल समाज स्वीकारत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तृतीयपंथीयांनी दोघांना आपल्यासोबत मालाड येथील घरी नेले आहे. रोशनी शेख आणि समीना शेख हे दोन तृतीयपंथी नवनाथ आणि अजयचा सांभाळ करणार आहेत. दोघांना शिकायचे असेल तर त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. नोकरी करण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)
तृतीयपंथीयांसह राहण्यासाठी दोन तरुणांनी घर सोडले
By admin | Updated: February 9, 2017 02:36 IST