वाडा: तालुक्यातील पिलानेपाडा येथील शाळा आपल्या आर्थिक योगदानातून डिजिटल करून येथील आदिवासी महिलांनी तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. ही वस्ती पूर्ण आदिवासींची आहे. ती मधील स्त्रियांचे शिक्षणही फारसे झालेले नाही. मात्र घोणसई केंद्राचे प्रमुख गुरूनाथ पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक आदेश भोईर, सीमा पाटील यांच्या कल्पकतेने या शाळेचे रंगरूप बदलण्यात आले. शाळा डिजिटल होण्यासाठी येथील उपसरपंच अमृता शिर्के व सामाजिक कार्यकर्ते अमित शिर्के यांनी शाळेला टॅबलेट भेट दिली. तर घोणसई केंद्रातील सर्व शिक्षकांच्या मदतीने झेरॉक्स मशीन व कॉम्प्युटर घेण्यात आले. यामुळे ही शाळा डिजिटल टॅब स्कूल बनली आहे. येथील महिलांनी ही शाळा डिजिटल बनविण्यासाठी लागणाऱ्या आपल्या मजूरीतील केलेल्या बचतीचा काही भाग दिला. यामुळे शाळेत मुले १०० टक्के उपस्थित राहून ज्ञान रचना वाद पद्धतीने शिक्षण घेऊ लागली. तिचे उदघाटन पंचायत समिती सभापती मृणाली नडगे यांच्या हस्ते व उपसभापती माधुरी पाटील, जि.प.सदस्या धनश्री चौधरी, पं.स. सदस्य मेघना पाटील, सरपंच ज्योती पिलाने, उपसरपंच अमृता शिर्के, गटशिक्षणाधिकारी कृष्णा जाधव यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी बोलतांना सभापती मृणाली नडगे या म्हणाल्या की, वस्ती शाळेचा कायापालट करून आज ही शाळा डिजिटल टॅब स्कूल झाली. हे एक आदर्श उदाहरण आहे. शाळेचा विकास हा महिला व ग्रामस्थांच्या हाती असतो. या शाळेतील आदिवासी विद्यार्थी संगणक धडे गिरवू लागले आहेत याचा मला अभिमान वाटतो. या शिक्षणामुळे पुढील जीवनात या मुलांना कसलेच भय राहणार नाही. गुरूनाथ पष्टे यांनी प्रास्ताविक केले. तर गटशिक्षणाधिकारी कृष्णा जाधव, उपसभापती माधुरी पाटील, माजी केंद्रप्रमुख नरेश भोईर, माजी उपसरपंच दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टॅब देण्यात आले. सूत्रसंचालन मयुरी ठाकरे यांनी केले तर आभार कृष्णा जाधव यांनी मानले. (वार्ताहर)
डिजिटल शाळेत आदिवासी महिलांचे योगदान
By admin | Updated: February 12, 2017 03:01 IST