वसई : दुरुस्ती करण्यासाठी जुन्या पूलावरून अवजड वाहनांना बंदी घालून त्यांच्यासाठी एकतर्फी वाहतूक सुरु केल्याने मुंबई-अहमदाबाद हायवेवर ट्रॅफीक जाम होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.वसई खाडीवरील जुना पूल दुरुस्त करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून या पूलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांसाठी जुना पूल मोकळा ठेवण्यात आला आहे. मात्र, अवजड वाहनांना गुजरातकडे जाण्यासाठी दुसऱ्या पूलाचा मार्ग ठेवण्यात आला आहे. त्यासाठी दुसऱ्या पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. परिणामी हायवेवर ट्रॅफीक जाम होऊन वाहनांच्या तीन-चा किलोमीटरपर्यंत रांगा लागू लागल्या आहेत. जुना पूलाच्या दुुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. पण, पूलाला तडे गेल्याने अवजड वाहनांना या पूलावरून वाहतूकीस बंदी घालण्यात आलेली आहे. दुरुस्तीचे काम कधी सुरु होणार आणि किती दिवस चालणार याबाबतीत कुणीही ठोस माहिती देत नसल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत.वसई विरार आणि पालघरवासियांना मुंबई आणि ठाण्याशी जोडणारा हाच एकमेव मार्ग आहे. पण, दोन वर्षांपासून जुन्या पूलाच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्याने हायवेवर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. अवजजड वाहने मनोर-वाडा-भिवंडी-ठाणे आणि चिंचोटी-कामण-भिवंडी-ठाणे मार्गे वळवण्यात आलेली आहेत. त्यानंतरही वसई खाडीपूलावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.(प्रतिनिधी)
मुंबई-अहमदाबाद हाय-वे वर ट्रॅफिक जॅम
By admin | Updated: October 9, 2016 02:41 IST