वसई : एका बड्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने दोन वेळा झालेली बदली रोखण्यात यशस्वी ठरलेल्या वसईच्या तहसिलदारांची आज अखेर बदली झाली. यावर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तहसिलदार सुनिल कोळी यांची १४ महिन्यांची वसईतील कारकिर्द अतिशय वादाची ठरली. कोळी यांचे वरिष्ठांशी नेहमी खटके उडायचे. तर राजकीय पुढारी देखील त्यांच्या वर्तनाबद्दल नाराज होते. त्यातच पुरवठा विभाग आणि रेती या दोन्ही विभागातील त्यांची कार्यपद्धतीत संशयास्पद होती. कोळी यांचाबाबत अनेक तक्रारी आल्यावरून पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात दोनदा कोकण आयुक्तांकडे अहवालही पाठवला होता. तसेच दोन वेळा बदलीची आॅर्डरही निघाली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. मात्र, कोळी यांचे एका बड्या राजकीय नेत्यांशी नातेसंबंध असल्याने त्यांना नेहमी अभय मिळत होते. यावेळी मात्र कोळी यांना आपली बदली थांबवता आली नाही. कोळी यांची बोरीवली अतिक्रमण तहसिदार म्हणून बदली झाली आहे.
वसईचे तहसीलदार सुनील कोळी यांची बोरिवलीला बदली
By admin | Updated: January 12, 2016 00:35 IST