जव्हार : मोखाडा, जव्हार तालुक्यात रविवारी वादळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील आदिवासींच्या घरांना बसला. यात खेडोपाड्यातील व शहरातील असंख्य घरांचे पत्रे उडाले असून शेकडो आदिवासींचे आर्थिक नुकसान होऊन ते बेघर झालेले आहेत. जव्हारमध्ये दुपारी ३.०० नंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पहाता पहाता खेडोपाड्यातील कौलारू पत्रांच्या घरांचे पत्रे, कौले, वार्यामुळे उडायला सुरुवात झाली. कुडाच्या घराचे तर घरच शिल्लक राहिलेले नाही. पावसाळ्यापूर्वी वादळी वार्यासह अचानक आलेल्या पावसाने काही भागात कहर केला. मोठ - मोठी झाडे रस्त्यावर पडलेली होती. खेडोपाड्यातील आदिवासींच्या कच्चा घरांची अवस्था तर याहूनही भयानक अशीच झाली. खेडोपाड्यातील असंख्य शेतकर्यांच्या शेतातील लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या शेडनेट, पॉली हाऊस, विहिरी या बांधकामांचे वादळी वार्यासह आलेल्या पावसाने लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरातही सोसाट्याचा वारा सुटला होता. ज्या ज्या लोकांनी घरासमोरी, दुकानासमोर पडव्या लावल्या होत्या, त्या क्षणार्धात उडाल्या आणि दुकाने उघडी पडली. कुणाच्या घराचे पत्रे उडाले, तर कुणाच्या घराची कौले उडाली. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जव्हारमध्ये शेकडो लोकांचे आर्थिक नुकसान होऊन हाहाकार झाला होता. जव्हारमध्ये वारा सुरू झाल्यामुळे पाऊस पडला नाही, त्यामुळे दुकानांचे व मालाचे नुकसान झालेले नाही. वादळी वार्यामुळे संपूर्ण शहरात धूळ पसरून काळोख पडला होता. रस्त्यांवर कचर्याचा व पाल्याचा खच पडला होता. नुकसान भरपाईसाठी खेडोपाड्यातील आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत व त्याचे पंचनामे करण्याचे काम तलाठी करीत आहेत. (वार्ताहर)
जव्हारला वादळाचा फटका
By admin | Updated: May 20, 2014 01:55 IST