लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिवंत वीजवाहिनीचा झटका लागल्यावर उपचारासाठी फरफट होऊनही मृत्युशी नायर रुग्णालयात झुंज देणाऱ्या चहाडे (सज्जनपाडा) येथील ९ वर्षीय रु पाली वरठाची प्रकृती पुन्हा खालावली आहे.गेल्या महिनाभरापासून रुपालीवर नायर रूग्णालयात उपचार सुरु आहेत अलीकडेच तिच्यावर शस्त्रक्रि याही करण्यात आली होती. ती बरी होण्याची चिन्हे दिसत होती मात्र तिच्या हाताच्या भाजलेल्या जखमातून गेल्या तीन दिवसांपासून रक्तस्त्राव होत आहे तो थांबून या जखमा बऱ्या होईपर्यंत तिच्यावर नसा जोडणींची शस्त्रक्रिया होणे शक्य नाही. रक्तस्रावामुळे तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण बरेचसे कमी झाले असून तिला दोन-तीन वेळा रक्त देण्यात आले व पुढेही देण्यात येणार आहे. या रक्तस्रावामुळे तिच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्याने तिची प्रकृती बिघडली आहे असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले आहे.या परिस्थितीत रु पालीच्या हृदयक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने तिला नायरमधील हृदयरोगतज्ञ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.या नऊ वर्षाच्या आदिवासी रुपालीला असह्य यातना सोसाव्या लागत आहेत. मात्र तिची विचारपूस करण्यास वा काही मदत देण्यास पालकमंत्री विष्णू सवरा, या भागाचे आमदार विलास तरे यांना वेळ मिळालेला नाही. महिना झाला तरी रुपालीला कोणतीच शासकीय मदतही मिळालेली नाही किंवा महावितरणच्या प्रशासनानेही तिच्या प्रकृतीविषयी चौकशी केली नाही. जिल्ह्यातील रहिवासी म्हणून व त्यातही अनुसूचित असलेल्या रुपालीची चौकशी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे कि नाही असा सवाल उभा राहिला आहे.गेल्या महिन्याभरापासून रुपालीसोबत तिचा भाऊ व नातेवाईक राहत आहेत. रुपालीला प्रसंगी रुग्णालयात औषधे उपलब्ध नसली तर ती बाहेरून आणावी लागतात व किमान दोन माणसांचा रोजच्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च व तिला बाहेरून लागणारा पोषक आहार याचा दिवसाचा खर्च खूपच मोठा आहे. रोजंदारीवर २५० ते ३०० रुपये रोज कमविणाऱ्या तिच्या वडीलांना हा खर्च कसा झेपेल असा सवाल आहे. आपल्या भूकेपेक्षा बहिणीची औषधे महत्वाची म्हणून तिचा भाऊ अनेकदा एक वेळ उपाशी राहून दिवस काढतो आहे. व वाचलेल्या पैशातून तिची औषधे आणतो आहे. पालघरचे आमदार अमित घोडा यांनाही तिच्यासाठी काही करावेसे वाटत नाही. माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित तिचे समाजबांधव असूनही तेही तिच्याकडे फिरकलेले नाहीत. त्यांच्याकडे पैसे नसले तरीही त्यांनी रुपालीच्या उपचारासाठी कोणत्याही संकटाशी सामना करायला तयार असल्याची कबुली रुपालीच्या भावाने दिली. काही दानशूरांनी दिलेल्या आर्थिक मदतीवर आजपर्यंत त्यांचा खर्च भागला आहे. मात्र पुढे ही तिला या उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी दानशूर पुढे येतील काय? उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नवे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे याबाबत काही पुढाकार घेतील की तिची मृत्युशी सुरू असलेली झुंज नुसतीच पहात राहतील?
रुपालीची प्रकृती बिघडली, पैसेही संपलेहितेन नाईक।
By admin | Updated: May 22, 2017 01:45 IST