वाडा : वाडा तालुक्यातील खरिवली येथे असलेल्या दगडखाणीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेसह अनेक समस्या उद्भवल्या असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. ही दगडखाण बंद करण्याची मागणी शिवसेना वसई-विरार विक्रमगड विधानसभा सहसमन्वयक गोविंद पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
खरिवली येथील आदिवासी ग्रामस्थ देवराम कातकरी (सवर) यांच्या नावावर याच गावातील गृहस्थ महेश जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून दगडाचे उत्खनन करत आहेत. दगडाचे लाखो ब्रास उत्खनन झाले असून, राॅयल्टी मात्र नाममात्र काढल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या दगडखाणीत होणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीमुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत जाताना येथील नागरिकांना वाट काढात जावे लागते.
दगडखाणीमध्ये कामामुळे स्फोट केले जातात. याने गावातील घरांना तडे गेले असून, पाण्याचीही पातळी खोल गेली आहे, त्यामुळे प्रदूषणही होत आहे, असे पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. ही दगडखाण बंद करण्याची मागणी पाटील यांनी निवेदनाद्वारे केली असून, निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.