विरार : कडक भूमिका घेवून महापालिकेचा महसूल वाचवताना काही आवश्यक बाबींना महापालिका आयुक्तांनी अंकुश लावल्यामुळे त्याचा विपरित परिणाम कामकाजावर झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात केली जात आहे.वसई-विरार महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त सतीश लोखंडे यांनी अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे बेताल सुटलेल्या भूमाफियांमध्येहीे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर लोखंडे यांनी कामगार कपात करून पालिकेचे कोट्यावधी रुपये वाचवले. कोणालाही न कळवता स्वत: परस्पर साईट व्हिजीट करून लोखंडे यांनी तालुक्यातील अनेक समस्या मार्गी लावल्या. मंगळवार आणि गुरुवार जनता दरबार घेवून त्यांनी नागरीकांच्या समस्या, अडचणीही थेट मार्गी लावल्या.त्यामुळे त्यांची डॅशींग अशी प्रतिमा तयार झाली. ही कामे करीत असताना, त्यांच्याकडून काही चुकाही झाल्याचे पालिकेत बोलले जात आहे. महापालिकेला रसद पुरवणारा भांडार विभाग त्यांनी बंद केला.त्यामुळे टाचणी, कागद, स्टॅपलर पीन या सारख्या दैनंदिन वस्तूंसह विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभागाला लागणाऱ्या मालासाठी खाते प्रमुखांना मुख्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. विद्युत आणि पाणी पुरवठा या अत्यावश्यक विभागाला लागणाऱ्या वस्तूही कोटेशन मागवून, ते मंजूर करून, वस्तू प्रत्यक्षात हाती यायला किमान ८ दिवस लागत आहेत. त्यामुळे दररोज करावी लागणारी कामे आठ-आठ दिवसांनी करावी लागत आहेत.त्यातच आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेवून दहाच्या आत कामावर हजर राहण्याची तंबी दिल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. (प्रतिनिधी)काय म्हणताहेत कर्मचारीआम्ही कामावर कधी येतो याची वेळ कळते. मात्र, आम्ही सायंकाळी ८ वाजेपर्यंत कामे करीत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही का? आयुक्त स्वत: कधीही दहाच्या आत येत नाहीत. रात्री उशिरापर्यंत कामगारांना ताटकळत ठेवतात, असा सूरही उमटत आहेत.
आयुक्तांच्या कडक भूमिकेचा पालिकेच्या कामावर परिणाम
By admin | Updated: March 31, 2016 02:44 IST