वसई: विरार शिवसेनेने अकरा वर्षांपूर्वी अतिवृष्टीतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. कोर्टाने याप्रकरणी तत्कालीन महिला आघाडीप्रमुखला दोषी ठरवत एक महिन्याची कैद आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दहा शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली.२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे आपदग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेनेने २३ आॅगस्ट २००५ रोजी सकाळी ११.३० वाजता विरार पूर्वेकडील मंगल कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी तत्कालीन महिला आघाडीप्रमुख अरुणा अरुण पेडणेकर यांनी यांनी तलाठी लक्ष्मण सोनार यांच्या तोंडाला काळे फासले होते. याप्रकरणी तलाठी लक्ष्मण सोनार यांनी विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर विरार पोलीसांनी अरुणा पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सदानंद पिंपळे व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वसई न्यायालयात खटला सुरु होता.मागील प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा निकाल देताना जेएमएडीसी कोर्टाचे (प्रतिनियुक्ती रेल्वे कोर्ट) न्या.एम.वाय.वाघ यांनी अरुणा पेडणेकर यांना दोषी ठरवून त्यांना एक महिन्याची साधी कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर अरुणा यांनी जामीन अर्ज दाखल केल्याने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, सर्वांकडून एक वर्ष त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणूकीची हमी देखील घेण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य दोषींपैकी दिलीप पिंपळे व इतर दहा जणांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्योत्सना गवळी यांनी काम पाहिले.
आंदोलन खटल्याचा ११ वर्षांनी निकाल
By admin | Updated: January 11, 2016 01:46 IST