वाडा : आदिवासी समाजाला नोकऱ्यांत १०० टक्के आरक्षण दिल्याने बिगर आदिवासींत नाराजी निर्माण झाली आणि बिगर आदिवासींनी सर्वांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले. या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असतानाच रविवारी संध्याकाळी पालघर जिल्हा पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आदिवासींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, असे मत व्यक्त करून याबाबत राज्यपालांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.पालघर जिल्ह्यातील आदिवासी आरक्षण रद्द करावे आणि तलाठी भरतीला स्थगिती द्यावी, या मागण्यांसाठी वाडा येथे बिगर आदिवासी आरक्षण हक्क समितीचे सात दिवस साखळी उपोषण सुरू होते. या आंदोलनाला आ. शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, माजी खा. बळीराम जाधव यांच्यासह जिल्हापरिषद सदस्य पंचायत समिती पदाधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. शिवसेना नेते अनंत तरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आरक्षणात बदल करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर, पालकमंत्री विष्णू यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली.या वेळी चंद्रकांत पष्टे, विलास आकरे, युवराज ठाकरे, निलेश गंधे, भाजपाचे राजू पाटील, वाडा उपसरपंच रोहन पाटील, कुणाल साळवी, मनीष देहेरकर आदी मान्यवरांसह स्थानिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
आदिवासींचे आरक्षण संख्येच्या प्रमाणातच हवे
By admin | Updated: September 14, 2015 23:10 IST