शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या पंचवीस ते तीस गावांतील ग्रामस्थ वीज महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे कमालीचे वैतागले असून दुप्पट तिप्पट वीज बिल भरून ही एक तासही वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. वारंवार तांत्रिक बिघाड होऊन फ्यूज, डिपी उडतातात. तक्रारी करूनही ही वायरमन गाव, पाडयावर येत नसल्याने दिवसा, रात्री-बेरात्री ग्रामस्थाना जीव धोक्यात घालून फ्यूज बदलून वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो आहे. विशेष म्हणजे फ्यूज, डिपीसाठी लागणाऱ्या तांब्याच्या तारा येथील ग्रामस्थ वर्गणी करून खरेदी करीत असल्याने या परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील वीज यंत्रणा पन्नास वर्षापूर्वीची असून, सडलेले पोल, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, कमकुवत ट्रान्सफार्मर यामुळे अगोदरच गाव, खेडोपाडयातील नागरिकांत त्रस्त झाले आहेत. त्यात भर म्हणून विजेच्या अव्वाचे सव्वा येणाऱ्या वीज बिलामुळे त्यात भर पडली आहे. महावितरणाच्या या कारभाराविरोधात अनेक वेळा तक्रार, मोर्चे, आंदोलन करूनही गेल्या पाच वर्षात कोणताही फरक पडलेला नाही. या परिसरात वीज पूरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज महाविरण कंपनी कडून कोणतीच उपाय योजना केली जात नसल्याचे वीजेअभावी येथील हजारो लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसातून होणारे भारनियमनामुळे शेती, डायमेकिंग व्यवसाय तसेच घरगुती कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाढवण, वशेर, तडियाळ, गुगवाडा, बाडापोक्षरण, धा. डहाणू इत्यादी तीस ते पस्तीस गावात सुमारे पंचवीस हजार कुशल, अकुशल तरूण डायमेकींगचा व्यवसाय करीत असतात. त्यांना वीजेवरच अवलंबुन रहावे लागते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून दिवसांतून पंधरा ते वीस वेळा वीज पुरवठा खंडीत होत आहे. दोन, तीन तास वीजपुरवठा खंडीत होणे ही तर नित्याचीच बाब झाल्याने येथील शेतकरी, डायमेकर्स हवालदील झाले आहेत. महावितरणने याची वेळीच दखल घेऊन सुधारणा न केल्यास जनतेचा तीव्र प्रक्षोभ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. मध्यंतरी उर्जामंत्र्यांनी घेतलेली बैठकही निष्फळ ठरली आहे.
ग्रामस्थच करतात यंत्रणा दुरुस्त
By admin | Updated: May 12, 2017 01:24 IST