नवी मुंबई : नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार रविवारी महिलांची हेल्मेट रॅली तसेच फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते.मोटारसायकल चालकांकडून हेल्मेटचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक अपघातांमधे हेल्मेट नसल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मोटारसायकल चालवताना चालक व त्याच्या सहप्रवाशानेही हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्यावतीने रविवारी महिलांची मोटारसायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली. नेरूळ ते वाशी दरम्यान निघालेल्या या रॅलीमध्ये शहरातील महिला व तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या. या सर्वांनी हेल्मेट घालून इतर मोटारसायकल चालकांनाही हेल्मेटचा वापर करण्याचा संदेश दिला. त्यानुसार सानपाडा, एपीएमसी, कोपरी मार्गे वाशीतील शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. त्याचप्रमाणे शनिवारी ज्येष्ठ नागरिकांनीही या जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी यमाची वेषभूषा केलेल्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या चालकांना आशीर्वाद देत त्यांच्यात प्रबोधन केले. वाशी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने कोपरी नाका येथे हा उपक्रम राबवला. यावेळी सुमारे दोन हजार पत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती नमूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे धोकादायक, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक या विषयावर कार्यशाळा देखील संपन्न झाली. ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी तळोजा वाहतूक पोलिसांच्या वतीने ही कार्यशाळा भरवण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी, चालक तसेच वाहतूक पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांची उपक्रमांमधून जनजागृती
By admin | Updated: January 19, 2015 01:17 IST