हितेन नाईक / पालघरमच्छीमार समाज आणि शिवसेनेचे एक अतूट नाते असून त्यांच्या अस्तित्वावर उठलेल्या वाढवणं आणि जिंदाल जेट्टी विरोधाच्या संघर्षात शिवसेना तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही शिवसेना जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी महिला मेळाव्यात दिली.ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल समाज संघाच्या सभागृहात महिला मेळावा आणि हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.मासे हा एक प्रोटिनयुक्त सकस आहार असल्याचे आता जगाने मान्य केले असून मोठ्या प्रमाणात त्याची मागणी वाढते आहे. अशावेळी आपल्या मच्छिमार समाजातच उपवासाच्या नावाने मासे आहारातून वर्ज्य करण्याचा प्रकार फोफावत असल्याचे दु:ख मच्छिमार प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. आज १० हजार कोटीचे मासे आपल्या देशातून निर्यात केले जात असतांना त्याचा कुठलाही फायदा मच्छिमार समाजाला होत नसल्याचेहि त्यांनी सांगितले. मुंबई व परिसरात दहा महानगर पालिका क्षेत्रात मच्छिला मोठी मागणी असल्याने मच्छिमार महिलांनी आपल्या व्यवसायाची क्षेत्रे वाढवावित असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने खेकडा पालनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला २८ कोटींचा निधी मंजूर केला पण पालघर जिल्ह्याला मात्र ठेंगा दाखविला पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खेकडा व्यवसायाला पोषक वातावरण असल्याने मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल. मच्छीमारांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री खोतकर यांच्या सोबत आपली चर्चा झाल्याची माहिती आ. घोडा यांनी दिली. एकंदरीत शासनाच्या मच्छीमारी विरोधी कारवाया मुळे मच्छीमारामध्ये प्रचंड असंतोष असतांना या कार्यक्रमात काही वक्त्यांना वाढवणं बंदर विरोधी आणि त्यांच्या राजकीय धोरणा विरोधी न बोलण्याबाबत आयोजका कडून सक्त ताकीद देण्यात आल्याने अनेक वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याचा काही उपस्थित महिलांनी निषेध व्यक्त केला. त्यामुळे आमचेच काही मच्छिमार नेते वाढवणं बंदराला छुपा पाठिंबा देतात कि काय असा सूर ह्या कार्यक्र मात निघत होता. मात्र आम्ही वाढवणं बंदराला शेवट पर्यंत विरोध करणार असे उपस्थित महिलांनी सांगितले.
बंदर, जेट्टीच्या संघर्षात शिवसेना जनतेसोबत
By admin | Updated: April 24, 2017 02:08 IST