पालघर : भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार संघांना एकत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.पालघर ला जिल्ह्याचा दर्जा मिळून जवळजवळ साडेतीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला. पण रेल्वेच्या लेखी अजूनही पालघर दुर्लक्षीतच ठेवण्यात आले आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आणि येण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लांबपल्ल्याच्या गाड्यांना ह्या स्थानकात थांबा आहे. विशेष म्हणजे मागच्या १४ वर्षात पालघरचे झपाट्याने नागरिकरण होऊन सुद्धा पश्चिम रेल्वेने एकाही लांब पल्ल्याच्या नव्या गाडीला पालघर स्थानकात थांबा दिलेला नाही. अगदी ह्याच धोरणावर बोट ठेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने लांबपल्ल्याच्या काही गाड्यांना पालघर स्थानकात थांबा देण्याची मागणी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता ह्यांच्याकडे केली आहे.तसेच संस्थेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ झरे यांची भेट घेत सखोल चर्चा केली. शिष्टमंडळाची विनंती मान्य करुन जिल्हाधिकारी डाँ. प्रशांत नारनवरे ह्यांनी अधिकृत रित्या पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले।तसेच सेनेचे नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे,पालघर पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे ह्यांनीसुद्धा डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या मागणीला दुजोरा देऊन ही मागणी लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी रेल्वेशी पत्रव्यवहार केला आहे.तसेच पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटिल ह्यांनी रेल्वेला लिहिलेल्या पत्रात संघटनेची मागणी रास्त असल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे.महाराष्टÑ संपर्क क्रांतीला थांबा द्या !पालघरला रोज ४८, डहाणूला ५५ तर बोईसरला ६० गाड्यांना थांबा आहे. महाराष्ट्र संपर्क क्रांतीला महाराष्ट्रात बोरिवलीत थांबा असून ही गाडी दररोज १२ ते १५ मिनिटे केळवे अथवा पालघरला सायडिंगला असते.
पश्चिम रेल्वेकडून पालघर अद्यापही दुर्लक्षितच, राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकारांचा रेल्वे प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:34 IST