मोखाडा : कांदाकापणी यंत्र, सौरऊर्जेवर चालणारी कार, मका व मळणी यंत्र, पवनचक्कीद्वारे पाणीउपसा यंत्र, आपत्कालीन क्रेन, लिंबापासून विद्युतनिर्मिती, बहुउद्देशीय पिरॅमिड यंत्र इ.सारख्या अनेक वैविध्यपूर्ण व नावीन्यपूर्ण साधनांनी येथील विज्ञान तालुका प्रदर्शन गाजले. येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २२ आणि २३ डिसेंबरला झालेल्या दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनात खेड्यापाड्यांतील आदिवासी बालकांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने बनविलेल्या वैज्ञानिक साधनांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. मोखाडा पंचायत समिती सभापती सारिका निकम यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी मोखाडा पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी प्रदर्शनात समाजोपयोगी साहित्य मांडले गेले पाहिजे व अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून मोखाड्यासारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील बालकांमधून भावी अब्दुल कलाम निर्माण व्हायला हवेत, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी जि.प. सदस्य प्रकाश निकम, पं.स. सदस्य वामन माळी, संगीता दिघा, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे, गटशिक्षणाधिकारी किरण कुवर, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र तुमडा, संतोष बात्रे उपस्थित होते. या वेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे, पं.स. उपसभापती मधुकर डामसे, गटशिक्षणाधिकारी किरण कुवर, शिक्षक पेढीचे संचालक हेमंत लहामगे, पर्यवेक्षक बी.आर कापडणीस, सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एन. पाटील, स्मिता पाटील यांनी केले.
कांदा कापणीयंत्र, सौर कार झाले पुरस्कृत
By admin | Updated: December 25, 2015 02:01 IST