जव्हार : आदिवासी कष्टकरी आहे, ढोर नाही, माणुसकीची भीक नको, लढेंगे जितेंगे, आम्हाला बेकार भत्ता मिळालाच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय सोडणार नाय, या तहसीलदारांचे करायचे काय? खालती डोके वरती पाय, अशा घोषणा देत तहसीलवर श्रमजीवी संघटनेच्यावतीने मंगळवारी तालुका सचिव संतोष धिंडा व तालुका अध्यक्ष कमळाकर भोरे, यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला व कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या देऊन घोषणा देण्यात आल्या. या तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमधील २९ गावपाड्यातील ५२७९ मजूरांनी कामाची मागणी १६ डिसेंबरला केली होती. त्यापैकी काही गावांत अजूनही कामे सुरु झालेली नाहीत व काही गावांमध्ये कमी मस्टरचे काम सुरु झाले होते, तसेच या आधी मजुरांची शेतीची कामे असल्याने कुटुंबातील एकच व्यक्ती मजूरीस येत असत, मात्र शेतीची कामे संपल्यामुळे मागणी केलेल्या सर्व मजूरांच्या कामाचे मस्टर काढावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता. तो अद्याप न मिळाल्यामुळे आम्ही बेकार भत्ता मिळविण्यासाठी हा मोर्चा काढला असे संतोष धिंडा यांनी लोकमतला सांगितले. जो पर्यत भत्ता मिळणार नाही तो पर्यत आम्ही उठणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. (वार्ताहर)
जव्हार तहसील पुढे श्रमजीवीचा ठिय्या
By admin | Updated: February 9, 2017 03:41 IST