वसई : पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक प्रवाशी असलेले तिसरे आणि दिवसाला सुमारे पंधरा लाखाचा महसूल देणारे नालासोपारा रेल्वे स्टेशन कोणत्याही प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने अजूनही उपेक्षितच आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशन नेहमीच गर्दीने ओसंडून वाहत असते. स्टेशनवर सुविधा तर नाहीतच, उलट स्टेशन परिसरात फेरीवाले आणि बेकायदा पार्कींगने प्रवाशांची डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रवाशांची गैरसोय दूर करण्याऐवजी फेरीवाले आणि पार्किंगला अभय देण्यात धन्यता मानताना दिसतात. स्टेशन परिसरात गेल्या वर्षभरात ५७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही रेल्वेकडून प्राथमिक सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वाधिक महसुल देणारे नालासोपारा स्टेशन उपेक्षितांचे जिणे जगत आहे.नालासोपारा रेल्वे स्टेशनवरून दिवसाला सव्वादोन लाखा आसपास लोकल प्रवाशी ये-जा करतात. त्यातून रेल्वेला दरदिवशी किमान पंधरा लाखाचा महसूल मिळतो. चार फलाट असलेल्या रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एकवरचे छोटेसे स्वच्छतागृह सोडले तर दुसरे स्वच्छतागृह नाही. रेल्वे परिसरातही दुसरे स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची खूपच गैरसोय होताना दिसते. पिण्यासाठी पाणपोई नाही. त्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागते. फलाट क्रमांक एकवर कँटीनची व्यवस्था नाही. फलाट क्रमांक दोन-तीन वर दोन कँटीन आहेत. तर फलाट क्रमांक चारवर कँटीन नाही. चारही फलाटांवर बसायला पुरेशी बाके नाहीत. पंख्यांची पुरेशी व्यवस्था नाही. फलाट क्रमांक एकच्या दोन्ही दिशेला तिकीट खिडकी आहे. तर पूर्वेला विरारच्या दिशेला एक तिकीट खिडकी आहे. दोन्ही बाजूला मिळून नऊ एटीव्हीएम मशीन्स आहेत. पण, प्रवाशांची गर्दी इतकी असते की त्याही कमी पडत आहेत. आता रेल्वेने खाजगी तिकीट विक्री केंद्र सुरु केली आहेत. त्यांच्याशी रेल्वे तिकीट खिडक्यांमधील रेल्वे कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याने गर्दीच्या वेळी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांपैकी बऱ्याच खिडक्या बंद असतात. त्यात भरीस भर म्हणजे कर्मचारी अगदी कासवाच्या गर्दीने तिकीट देऊन प्रवाशांचा खोळंबा करतात.
भरघोस उत्पन्नानंतरही नालासोपारा उपेक्षित
By admin | Updated: January 23, 2016 02:43 IST