नवी मुंबई : आचारसंहिता जाहीर झाली आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. निवडणुका होईपर्यंत कामाचा विनाकारण तगादा नाही. महासभा, स्थायी समिती, प्रभाग समितीची कटकट नसल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याची उत्सुकता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही लागून राहिली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्याभरात ३२ मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे, जवळपास ६५ ते ७० छोट्या कामांचे भूमिपूजन या काळात पार पडले. पालिका कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू होती. निवडणुकीच्या अगोदर कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे तगादा लावत होते. कामाचा ताण वाढला होता. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मर्जी राखताना तारेवरची कसरत करावी लागत होती. महासभा, स्थायी समिती, प्रभाग समिती बैठकीमध्येही अनेक वेळा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना धारेवर धरत असतात. आचारसंहिता सुरू झाली की महापालिकेमधील कामाचा ताण थोडासा कमी होती. कर्मचारी व अधिकाऱ्यांना खुल्या वातावरणात काम करता येते. यामुळे आचारसंहिता कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. शुक्रवारी सायंकाळी आचारसंहिता जाहीर करण्यात आली व सर्वच कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या कर्मचा-यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By admin | Updated: September 13, 2014 02:00 IST