राहुल रनाळकर - मुंबई
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रंनी दिले आहेत. बोरीवलीतून विधानसभेवर तब्बल 79 हजारांच्या मताधिक्याने निवडून गेलेले विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे तूर्तास तरी स्पष्ट झाल्याने मुंबईतील ते पहिले मंत्री ठरतील. त्यामुळे क्रिकेटमुळे मुंबईतून जगभरात पोहोचलेल्या खेळाडूंनंतर मुंबईकर तावडे हे पहिले राजकीय फलंदाज ठरतील, असेच म्हणावे लागेल.
मंत्रिपदाच्या शर्यतीत मुंबईतील अनेक दिग्गज आसुसलेले असताना पहिली संधी कोणाला मिळणार, याकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागलेले होते. कारण टीम देवेंद्रच्या पहिल्या फळीत मान मिळावा, यासाठी सर्वच आजी-माजी आमदारांनी चांगलीच फिल्डिंग लावलेली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, ज्येष्ठ आमदार प्रकाश मेहता, कुलाब्यातील आमदार राज पुरोहित यांनी आपापल्या पद्धतीने यासाठी चांगलाच जोर लावला आहे. असे असताना सर्वाना बाजूला सारून तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने मंत्रिपदाची शपथ घेण्यात बाजी मारल्याचेच समजते.
वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा कार्यक्रम होणारे हे पहिले सरकार आहे. त्यामुळे या सोहळ्यात मुंबईकरालाही मान मिळावा, अशी सर्वाचीच अपेक्षा होती. कारण हे मैदान अनेक मुंबईकर खेळाडूंनी गाजवले आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा सोहळा असो वा वर्ल्डकपचे जेतेपद असो, हे मैदान अशा अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. त्यामुळे भाजपाच्या नव्या राजकीय फलंदाजीची ओपनिंगही मुंबईकर आमदाराच्या सहभागाने व्हावी, अशी अपेक्षा मुंबईकरांना असतानाच तावडे यांच्या नावाने ही इच्छा पूर्ण झाल्याचे भाजपा सूत्रंनी सांगितले.
विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाची भूमिका बजावताना विनोद तावडे यांनी प्रस्थापित सरकारला अस्वस्थ केले होते. त्यामुळे पक्षात त्यांची प्रतिमा गेल्या काही वर्षात उंचावली होती. याच कारणास्तव तसेच कोअर कमिटीचे सदस्य असल्याने
त्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याचे कळते.
मुंबईतील आणखी किमान 3-4 आमदार मंत्री होणार हे निश्चित आहे. पण शिवसेनेसोबतची बातचीत अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही.
च्शिवसेनेला किती मंत्रिपदे द्यावी लागतील, याचा अजूनही पुरता अंदाज भाजपा नेत्यांना आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीतील चार सदस्य 31 तारखेला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
च्कोअर कमिटीव्यतिरिक्त एक आदिवासी समाजाचा आमदार तसेच एक अल्पसंख्य समाजाचा आमदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. आता पुढच्या टप्प्यात मुंबईतील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे लक्ष लागलेले आहे.