लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : अंतराळातील तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणाऱ्या ८५ ते ९० प्रकारच्या विविध सामग्री सध्या आपल्या देशामध्ये तयार होत असून याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न आपला देश करीत असल्याचे प्रतिपादन इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. एम.आर.आर. प्रसाद यांनी पालघर येथे आयोजित कार्यक्र मात केले.अहमदाबाद येथील विक्र म साराभाई स्पेस सेंटर व पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने इस्त्रोने केलेल्या प्रगतीची माहिती विद्यार्थी व जनसामान्यांना व्हावी या हेतूने एका दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे.उद्घाटनप्रसंगी इस्त्रो चे शास्त्रज्ञ डॉ. एम प्रसाद, सुरेश मंजूळ, सतीश राव, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी, प्राचार्य डॉ. किरण सावे, माजी आमदार नवनीतभाई शहा, हितेंद्र शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते. इस्त्रोतर्फे राबविण्यात येणा-या अंतरिक्ष अभियानाची व प्रगतीची माहिती देऊन डॉ. प्रसाद यांनी या योजनेमध्ये देशातील दोनशे उद्योगांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. या क्षेत्रात आपला देश येणा-या काळात स्वयंपूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतराळ विश्वात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये असून प्रत्येक वर्षी २० उपग्रह अवकाशात सोडण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्यामुळे इस्त्रोमध्ये तरु णांना रोजगार मिळण्याची संधी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रदर्शनात उपग्रह, त्यामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी वापरण्यात येणारे अवकाशयान यांची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनात पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, चांद्रयान, मंगलायान, आर्यभट्ट यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आले आहे. तसेच इस्त्रोच्या उपग्रहामुळे टेलिव्हिजन, दूरध्वनी, मरीन नॅव्हीनेशन, आपत्कालीन व्यवस्थापन, जीपीएस तंत्रज्ञान तसेच नैसर्गिक साधनसामग्रीचा सुनियोजित वापर व व्यवस्थापन, तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवस्थापनामध्ये होणा-या वापराची माहिती देण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात याप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन असून ते पाहण्यासाठी विद्यार्थी येत आहेत. मंगलयानाने एक हजार दिवसाचा टप्पा गाठल्याबद्दल अॅड्. जी.डी. तिवारी यांनी इस्त्रोचे कौतुक व अभिनंदन केले.
पालघरच्या दांडेकर महाविद्यालयात इस्त्रोचे प्रदर्शन
By admin | Updated: June 21, 2017 04:16 IST