पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने गुटखा व पानमसाला विक्रीवर बंदी के ल्यानंतरही कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत काळ्या बाजारात गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे वारंवार केलेल्या कारवाईत निदर्शनास येत आहे. ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने मागील पाच वर्षांत जप्त केलेला एकूण १३ कोटी ६२ लाख ५८ हजार ३३७ रुपयांचा गुटखा, पानमसाला नष्ट केला आहे. गेल्या वर्षभरात जप्त केलेला जवळपास ४ कोटी ३४ लाख ५४ हजार २११ रुपयांचा गुटखा त्याच पद्धतीने नष्ट केला जाणार आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत ठाणे एफडीएने एकूण ३३८ एफआयआर दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्यात शासनाने २० जुलै २०१२ रोजी गुटखाबंदी लागू केल्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अवैध गुटखाविक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडसत्र सुरू ठेवले. आतापर्यंत १९ कोटी १६ लाख ४४ हजार ८९७ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याचदरम्यान ३० हजार ५४९ ठिकाणी अन्न पदार्थांच्या तपासण्या करून ६२६ ठिकाणी जप्तीची कारवाई केली. २०१६-१७ या वर्षात तपासण्यांची संख्या १४५८ असली तरी १९२ ठिकाणी जप्तीची कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण ३४४ प्रकरणांत खटले दाखल केले असून त्यामधील ६ प्रकरणांत ५४ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साडेतेरा कोटींचा अवैध गुटखा नष्ट
By admin | Updated: May 16, 2017 00:45 IST