- आरीफ पटेल, मनोर
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बेलपाडा अवढानी गावाच्या हद्दीत जीतमलवा ढाब्याजवळ अवैध वाहतूक करणारा ट्रेलर विविध प्रकारच्या केमीकल्ससह जप्त करण्यात आला. चालकासह ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयास्पद ट्रेलर उभा आहे अशी माहिती मिळाली असता पोलीस उपअधिक्षक एस. बी. धुमाळ , सपोनि एम. आय. पाटील यांनी चालकाला काय माल भरला आहे याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. गाडीत असलेल्या मालाबाबत पावती विचारली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. ट्रेलर (गाडी) तपासणी केली असता सुमारे ४ लाख ३० हजार रू. चे वेग वेगळ्या प्रकारचे केमीकल्स भरलेले एकूण ४३ प्लास्टीकचे ड्रम, ३५०० रू. किमतीचे रिकामे २०० लीटर क्षमतेचे प्लास्टीकचे ड्रम व ५ लाख रू. किमतीचे वाहन असे एकूण ९,३३,५०० रू. किमतीचा माल मनोर पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. बलजीत सिंग नाहीर सिंग धारीवाल (५७) रा. जीत मलवा ढाबा आवढाणी, हरनेकसिंग हाकमसिंग रौती (५७) रा. अंधेरी कुर्ला, किसनसिंग बलजीतसिंग धारीवाल (२७) रा. जीतमलवा अवढाणी ढाबा, हाकिम पारसनाथ सिंग रा. वापी, दिपक सिंग, राजुसिंग रा. वापी एकुण सहा आरोपी अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पो. उप. नि. अक्षय सोनावणे करीत आहेत.मी पदभार सांभाळल्यापासून सर्व प्रथम मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत रात्रभर चालणारे हॉटेल, ढाबे ११ नंतर बंद केले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांना आळा बसतो आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आजची ही कारवाई आहे. हे हॉटेल चालू असते तर हे तेलमाफीया सापडले नसते. - एस.बी. धुमाळ, पोलीस उपाधिक्षक, मनोर