तलासरी : कर आकारणी रजिस्टरर्स ३१ मार्चपर्यंत अद्ययावत करण्याची शासनाची अधिसूचना त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणूका यामुळे तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतीची कर आकारणी रजिस्टरर्स अद्ययावत करणे बाकी असल्याने ग्रामसेवकांवर पाच टक्के पगार कपातीची टांगती तलवार आहे.अधिसूचनेनुसार ३१ मार्च पर्यंत कर आकारणी रजिस्टरे अद्ययावत करून बिले बनवून त्याची माहिती ग्रामसभेत देऊन त्यावर चर्चा घडवून आणणे आवश्यक असतांना अजूनपर्यंत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. नमुन नं. ९ कर मागणी रजिस्टर व नमुन नं. ८ कर मागणी रजिस्टर अद्ययावत करून बीले करणे, घरगुती कर तीन महिन्यात भरणे व व्यावसायिक १५ दिवसांत भरणे आवश्यक असते. परंतु ग्रामसेवकांनी रजिस्टरच अद्ययावत न केल्याने, बीलेही न दिली गेल्याने नागरीकांना कर भरता आलेला नाही. ३१ डिसेंबर २०१५ च्या शासन अधिसूचनेनुसार ३१ मार्चपर्यंत कर रजिस्टरे अद्ययावत करून बीले न आकारल्यास ग्रामसेवकांच्या पगारातून ५ टक्के पगार कपात करण्यात येणार असल्याने ग्रामसेवकांवर ही पगार कपातीची तलवार टांगती राहिली आहे. (वार्ताहर)
पाच टक्के पगारकपातीची ग्रामसेवकांवर टांगती तलवार
By admin | Updated: March 31, 2016 02:42 IST