पूजा दामले, मुंबई युती टिकणार की तुटणार, या निवडणुकीत कोणाची लाट उसळणार, अशा अनेक खमंग चर्चा नाक्यानाक्यावर, कुटुंबांमध्ये रंगल्या असतानाच सोशल नेटवर्किंग साइट्सवरून फिरणारे निवडणुकीसंदर्भातले मेसेज या चर्चांना फोडणी देत आहेत. हे मेसेज क्रिएट करण्यासाठी प्रत्येक पक्षाने, उमेदवाराने कंटेंट रायटर्स नेमले असून, यांना शब्दागणिक पैसे मोजले जात आहेत. या निवडणूक वातावरणात शब्दांचा भाव वधारत असल्याचे चित्र आहे. काम (न) केलेले असले तरीही प्रत्येकाला निवडणुकीच्या या काळात चर्चेत राहून ‘जनतेचा नेता मी’च हे दाखवून द्यायचे असते. मग अशावेळी काहीही करून चर्चेत राहणे हेच उद्दिष्ट असते. निवडणूक लढवण्यासाठी तयार असलेले बहुतांश उमेदवार हे सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव्ह आहेत. मात्र फक्त अॅक्टिव्ह असून चालत नाही, जनता वाचेल असे साहित्य पुरवणे गरजेचे असते. यामुळेच हे साहित्य तयार करण्यासाठी एका विशेष टीमची नेमणूक केली जात आहे. या काळात शब्दांचा भाव वधारला आहे. एकेका शब्दासाठी २ ते १५ रुपये इतके पैसे आकारले जात आहेत अथवा सगळ््याच मजकुरासाठी लाखभर रुपये देखील आकारले जात आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर, गुगल प्लस, मेसेज, पत्रक, घोषवाक्य, भाषण, प्रेस रिलीज या सगळ््या माध्यमांवर प्रभाव टाकण्यासाठी गरज असते ती शब्दांची. हे शब्द प्रभावी, थोडे जहाल तर प्रसंगी मनोरंजन करणारे असे असावे लागतात़ मात्र यातून उमेदवार लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे असते. हे सगळे अगदी मोजक्या शब्दांत प्रभावीपणे मांडणे ही तारेवरची कसरत असते. मात्र शब्द हे सर्वात प्रभावी माध्यम असल्यामुळेच राजकीय पक्ष, उमेदवार हे सढळ हाताने पैसे खर्च करीत आहेत. शब्दागणिक पैसे मोजले जात आहेत. प्रस्थापित अॅडव्हर्टाइजमेंट कंपनी, कंटेट रायटर्स हे शब्दागणिक पैसे न आकारता एकाच वेळी फी घेतात. ही फी लाख रुपयांपर्यंत देखील असू शकते.
निवडणुकीत शब्दांचा भाव वधारतोय
By admin | Updated: September 22, 2014 08:37 IST