बोर्डी : महावितरणकडून डहाणूतील वीज ग्राहकांच्या माथी मोठ्या रकमेची बीले मारली जात आहेत. चालू तसेच मागील रीडिंगमध्ये एकूण युनिटचा कोणताही ताळमेळ देयकात दिसत नाही. डहाणूतील मसोली येथील मुख्य वीज कार्यालयाअंतर्गत नरपड उप केंद्रात चिखले गावचा समावेश आहे. येथील लक्ष्मी प्रभाकर आगरी या महिलेला जानेवारी महिन्याचे साडेतेवीस हजाराचे बील आले आहे. ती रोजंदारीवर शेतमजूराचे काम करते. तिचे मासिक उत्पन्न तीन हजार रुपये आहे. पतीचे निधन झाल्यानंतर दोन मुलांना घेऊन कुडाच्या घरात राहत असून विजेचे तीन ते चार दिवे वापरते. आजतागायत प्रतिमहिना दोनशे रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वीज बील आलेले नसल्याची आकडेवारी वर्षभरातील बीलं पाहिल्यास लक्षात येते. मात्र या वर्षीच्या पाहिल्याच बिलाने वार्षिक उत्पना पेक्षा अधिक उच्चांक गाठल्याने तिचे कंबरडे मोडले आहे. अशिक्षितपणा व अज्ञानामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकांच्या घराच्या पायऱ्या तिला चढाव्या लागत आहेत. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती, वापरलेल्या रीडिंगचा फोटो बीलात छापणे त्यानंतर कॅशलेसचा अवलंब करून बील भरणा आदि प्रकारे संगणकीय प्रणालीचा अंगीकार महावितरणने केला आहे. समन्वयाअभावी ग्राहकांना विनाकारण त्रास होतो आहे. (वार्ताहर)
डहाणूत वीज ग्राहकांचे शोषण
By admin | Updated: February 15, 2017 04:29 IST