बोर्डी : शासनाच्या जात यादीत एखाद्या जातीसमोर कंसातील पोटजातीचा जात प्रमाणपत्रात उल्लेख करायचा नाही असा नियम असताना, त्या जातीचं प्रमाणपत्रं दिल्याने उमेदवारांना पुन्हा नव्याने जातीचा दाखला काढण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा विनाकारण भोगावी लागत असून आर्थिक भुर्दंडासह शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शासना तर्फे जातीचे प्रमाणपत्र देण्यात येते. सर्वोच्च न्यायालयानेही जात जशी आहे तशी ती वाचण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. याकरिता शासनाच्या जात यादीत उल्लेख असल्या प्रमाणेच जातीचा उल्लेख करून जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. मात्र ही प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या समितीच्या असे निदर्शनास आले आहे, की बºयाच प्रकरणातील जात प्रमाणपत्रे ही मूळ जात व कंसात पोटजाती दर्शविण्यात आल्या आहेत. तसेच ज्या जाती पोटजाती किंवा तत्सम जातीमध्ये दर्शविलेल्या आहेत. अशा स्वतंत्र जातीचा उल्लेख मूळ जातीच्या सोबत कंसामध्ये केलेला आढळला आहे. त्याचा फटका कुटुंबिय तसेच नातेवाईकांकरिता जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र काढण्याकरिता गेलेल्या बोर्डी येथील राकेश सावे यांना बसला आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वी काढलेल्या जात प्रमाणपत्रावर माळी (पाचकळशी) १२८ असा उल्लेख आहे. मात्र जात यादीत क्रमांक १२८ मध्ये माळी (वाडवळ), माळी (पाचकळशी), माळी (चौकळशी) असा उल्लेख नसून माळी नंतर स्वल्पविराम व पुढे तत्सम जाती व पोटजाती म्हणून पाचकळशी, चौकळशी, वाडवळ अशा स्वतंत्र नोंदी आहेत. त्यामुळे अर्जदाराने माळी या जातीचे जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल व त्यांचे माळी जातीचे पुरावे असल्यास माळी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येईल. किंवा पुरावे पाचकळशी, चौकळशी, वाडवळ असे असल्यास तसे प्रमाणपत्र देण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वारसदारांकरिता जात प्रमाणपत्र काढतांना आजोबा, वडील, काका यांचे वरील उल्लेख केलेले प्रमाणपत्र जोडता येणार नसून पूर्वीची जात प्रमाणपत्र बदलावी लागतील असे सांगण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रमाणपत्राकरिता सोबत कागदपत्र जोडावी लागतात त्यामध्ये शाळा सोडल्याच्या दाखल्याचा समावेश आहे. हा दाखला प्राथमिक शाळेतील नोंदीनुसार देण्यात येत असून त्यामध्ये माळी (पाचकळशी) असा उल्लेख आहे. मात्र दस्ताऐवजा मध्ये खाडाखोड करता येत नाही. दरम्यान अन्य जातीतील उमेदवारांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती महाईसेवा केंद्र चालकाने लोकमतशी बोलताना दिली.कुटुंबिय व नातेवाईकांकरीता जात प्रमाणपत्र काढण्याकरिता गेलो असता माळी (पाचकळशी) १८२ असा जात प्रमाणपत्रात उल्लेख असल्याने, हे प्रमाणपत्र नव्याने काढण्याची नामुष्की असंख्य जातबांधवांवर येणार आहे. या नव्या प्रक्रि येकरिता महसूल विभागाने दाखले वाटप शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे.- राकेश सावे, ग्रामस्थ, बोर्डी
जातप्रमाणपत्र नव्याने काढण्याची नामुश्की; आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:33 PM