जव्हार : तालुक्यातील साकूर येथील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय मुलींच्या निवासी आश्रमशाळेतील रसिला तेलंग या इयत्ता चौथींत शिकणाऱ्या विद्यार्थिंनीच्या २८ जुलै रोजी झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्रमजिवी संघटनेकडून देण्यात आला आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांसह साकूर आश्रमशाळेला भेट देऊन तिच्या पालकांची भेट घेतली. त्यावेळी आदिवासी विकास मंत्र्यांच्याच मतदारसंघात आदिवासी विद्यार्थिनीचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला हे माहीत असूनही, विष्णू सवरा यांनी ‘प्रशासनाने रसिला हिस रुग्णालयात नेले होते. परंतु उपचरादरम्यान तिचा मृत्यू झाला. यात प्रशासनाची चूक नाही. तरीही चौकशी करून दोषींवर कारवाई करू’ असे उत्तर देणे संतापजनक आहे, असे ते म्हणाले. घटना घडली तेव्हा सहायक प्रकल्प अधिकारी गुजर हे रजेवर होते, दुसरे सहायक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे हे ट्रेनिंगसाठी पुण्याला गेल्याचे सलामे यांनी सांगितले. यामुळे कार्यालयात प्रमुख असलेले पी.बी. देसाई हे रसिलाची प्रकृती चिंताजनक असतांनाही जव्हार येथेच होते. त्यांनी वेळीच उपचारासाठी प्रयत्न केले असते तर रसिलाचा जीव वाचला असता असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. देसाई यांनी हलगर्जीपणा केला म्हणून त्यांच्यावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही. तोपर्यंत जव्हार कार्यालयासमोर श्रमजिवी संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले. आश्रमशाळा पुरेसे अधिकारी आणि कर्मचार नसल्याने असे मृत्यू घडतात असे ते म्हणाले. (वार्ताहर)
रसिलाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
By admin | Updated: August 30, 2015 21:36 IST