भातसानगर : नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहापुरातील गणेशोत्सवाला चांगलाच रंग येऊ लागला आहे. इच्छुक उमेदवार या गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुढे-पुढे करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत आहे.ग्रामपंचायतीच्या बरखास्तीनंतर पहिल्यांदाच नगर पंचायत म्हणून अस्तित्वात आलेल्या शहापूर नगर पंचायतीची निवडणूक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहचण्याची नामी संधी चालून आली आहे. काही उमेदवारांचे स्वत:चे मंडळ असल्याचे आकर्षक देखावे निर्माण करून सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी काहींनी मंडळास सहाय्य करून त्यांच्या मार्फत प्रसिद्धी होवू घातली आहे. कधीही न फिरकलेले उमेदवार मंडपांच्या दारात उभे राहून भाविकांचे स्वागत करीत आहेत. मंडळांच्या बाहेर व मंडळाना शुभेच्छा देतानाची अनेक मोठमोठी छायाचित्रे झळकताना दिसत आहेत. तर काहींनी गणेशभक्तांना आरतीची पुस्तके, गौरी गणपतीसाठीची पाच फळांची पाकीटे घरोघरी आपापल्या मतदारांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)
गणेशोत्सवावर निवडणुकीचे सावट
By admin | Updated: September 23, 2015 23:37 IST