तलासरी : नेहमीच वादात सापडलेल्या दापचरी नाक्यावर कामावर असलेल्या तीन आदिवासी तरुणांना सद्भाव कंपनीने अन्यायकारकरीत्या कामावरून काढल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सिटू संघटनेने दापचरी तपासणी नाक्यावर शुक्रवारी आंदोलन करून आदिवासी तरुणांना कामावर घेण्याची मागणी केली.माकपाचे तलासरीतील नेते तलासरी पंचायत समितीचे सभापती वनशा दुमाडा, नंदू हाडळ, राजेश खरपडे, अनिल झिरवा, संतोष खटाल इ. सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी दापचरी तपासणी नाक्यावर जाऊन सद्भाव कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.दापचरी तपासणी नाक्यावर स्थानिकांना रोजगार द्या, यासाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे नाइलाजाने स्थानिक आदिवासी तरुणांना कामावर घेण्यात आले. परंतु, स्थानिक तरुण आपले काळेधंदे उघड करतील, या भीतीने स्थानिक आदिवासी तरुणांना क्षुल्लक कारणावरून कामावरून काढून टाकले जात आहे. मात्र, या वेळी मोठ्या प्रमाणात चुका करूनही व्यवस्थापन कंपनी परप्रांतीयांना कामावरून काढत नसल्याचा आरोप कामावरून काढून टाकलेले आदिवासी तरुण आशीष भिमरा, सुभाष गडग, संजय हाडळ यांनी केला.कामावरून काढलेल्या तीन आदिवासी तरुणांनी याबाबत कंपनी व्यवस्थापक संतोष सिंग यांना जाब विचारला असता त्यांनी मुंबई येथे जाऊन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटावयास सांगितले. या वेळी मुंबई येथे गेलेल्या तरुणांना मुंबईतील अधिकारी मिश्रा यांनी आदिवासी लोकांना काम करता येत नाही. आदिवासींना आम्हाला कामावर ठेवायचे नाही, असे सांगून तेथून या तिन्ही तरुणांना हाकलून लावले.कामावरून काढलेले कामगार सिटू संघटनेचे असल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता सद्भाव कंपनीने या आदिवासी तरुणांना कामावरून काढले. माकपाच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. या वेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम आठव यांनी परिस्थिती अटोक्यात आणली. (वार्ताहर)
दापचरी नाक्यावर माकपाचे आंदोलन
By admin | Updated: September 7, 2015 03:47 IST