पालघर : माकुणसार, विळंगी, आगरवाडी इ. गावांच्या हद्दीत पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून परिसरातील शेतजमिनीमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरू नये, यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवण्यात आले असताना वन विभागाने त्या राखीव क्षेत्रावर तिवरांची लागवड सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले असून शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.मौजे माकुणसार, विळंगी, आगरवाडी या गावांच्या हद्दीत राज्य शासनाची पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून सदर खारभूमी योजनेचे क्षेत्र हे महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार अधिसूचित केले आहे. वरील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या समुद्र, खाडी यांच्या जवळपास असल्याने भरतीचे पाणी शेतात घुसू नये, क्षेत्र सुरक्षित राहून नापीक बनू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. असे असताना या कार्यक्षेत्रात वन विभागामार्फत तिवरांची (कांदळवन) लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. पुरंदरे खारभूमी योजनेच्या प्रापण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अकृषिक लागवड ही नियमबाह्य असून या लागवडीमुळे माकुणसार, आगरवाडी, विळंगी, नगावे, तिघरे या गावांतील बागायती व शेतीक्षेत्रामध्ये खारे पाणी जाऊन त्या नापीक बनणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावातील विहिरी, कूपनलिकांमधील पिण्याचे पाणीही क्षारयुक्त व मुचूळ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नापीक होऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत, तर दुसरीकडे गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्यही निर्माण होणार असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक यांचे म्हणणे आहे. वन विभाग आणि खारभूमी सर्वेक्षण विभागामधील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून माकुणसार, विळंगी व आगरवाडी सरपंचांनी यासंदर्भात खारभूमी विभागाकडे तक्रार केल्यानंतर खारभूमी विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, वन विभाग अधिकाऱ्याकडे विचारणा आपण करावी, असे पत्र खारभूमी विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने तिन्ही गावांतील सरपंचांना कळविले आहे. त्यामुळे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक, भूपेश म्हात्रे, नरेश पाटील, वसंत भोईर, प्रदीप भोईर, प्रशांत घरत इ.नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
राखीव क्षेत्रात तिवरांची लागवड
By admin | Updated: December 26, 2015 00:26 IST