वाडा : वाड्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या गॅस वितरकाकडून गॅसच्या रकमेपेक्षा जादा दर आकारल्याने वाड्यातील ग्राहक आनंद आंबवणे यांनी भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार करून ग्राहकांची होणारी लूट थांबविण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने वाड्यातील आर.डी. पातकर या गॅस एजन्सीकडे आपला नोंदविलेला गॅस घेतला असता ६१६ रु. ऐवजी ६२५ रु. रक्कम आकारून संबंधित गॅस वितरकाने ११ रु. जादा आकारल्याने संबंधित ग्राहकाने याविरोधात पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार नोंदविली आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची तक्रार झाली असता आर.डी. मातकर गॅस एजन्सीला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने ७२ हजार रु.चा दंड आकारला होता. तरीसुद्धा ही एजन्सी वितरण मूल्यांच्या नावावर ग्राहकांची लूट करत आहे. वाड्यात सुमारे ९ हजार ७०० एचपीसीएल कंपनीचे ग्राहक असून प्रत्येक ग्राहकाकडून ११ रु. जादा आकारल्याने दरमहा सुमारे १० लाखांहून अधिक रकमेची लूट आर.डी. पातकर गॅस एजन्सी करत असल्याचा आरोप ग्राहक मंचाचे अध्यक्ष संजय शहा यांनी केला आहे. यासंदर्भात राजेंद्र पातकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)
गॅस वितरकाविरोधात वाड्यात तक्रार
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST