वाडा : आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात सुमारे साडेतीनशेडून अधिक ग्राम पंचायतीच्या निवडणूका १७ एप्रिल रोजी होत आहेत. या निवडणूकीसाठी २९ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. मात्र अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्ग यासाठी आरक्षित असलेल्या जागांवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला जातपडताळणी समितीने दिलेले जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे केल्याने या दाखल्या अभावी अनेक इच्छुक छाननीमध्ये अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करावी व ते सादर करण्यासाठी उमेदवारांना मुदत द्यावी अशी विनंती वाडा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पटारे यांनी राज्य निवडणूक आयोग व पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गीय आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत राज्य निवडणुक आयोगाने दोन परिपत्रके जारी केली असून २ मार्च रोजीच्या परिपत्रकामध्ये ज्या उमेदवारांच्या अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यानी जात पडताळणी समितीकडे सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोचपावती जोडावी असे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर) परिपत्रकामुळे गोंधळ : ११ मार्चच्या राज्य निवडणूक आयोगाच्याच दुसऱ्या परिपत्रकामध्ये उमेदवाराने उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या या दोन वेगवेळ्या परिपत्रकामुळे मागास वर्गीय जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारामध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.
जातवैधता प्रमाणपत्र ‘गले का काटा’
By admin | Updated: March 30, 2016 01:13 IST