दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक असलेल्या गांधारपाले गावातील बौद्धकालीन लेण्यांकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने लेण्यांची दुरवस्था झाली आहे. लेण्यांकडे जाणाऱ्या पायवाटेवर दगड आल्याने वर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय पायवाट निसरडी झाली असून पर्यटकांना वर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महाड या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराजवळ आणि मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या गांधारपाले लेण्यांकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी विष्णुपुलीत राजाचे वास्तव्य होते. बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचाराचे हे एक केंद्रबिंदू होते. महाड शहराजवळ आणि महामार्गालगत असल्याने या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने या ठिकाणी केवळ पायवाट करण्याचे काम केले. याव्यतिरिक्त या ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध केल्या नाहीत.एकूण २१ लेण्यांपैकी दोन मोठे सभागृह या ठिकाणी पहावयास मिळतात. तर दोन शिलालेख आणि एक नक्षीदार स्तूप देखील आहे. सध्या लेण्यांकडे जाणाऱ्या पाऊलवाटेवरच ऐन पावसाळ्यात भलामोठा दगड येवून पडला आहे. यामुळे पाऊलवाट जवळपास बंदच झाली आहे.- पावसामुळे लेण्यांच्या परिसरातील गवत वाढले आहे. ते गवत काढण्याचे काम सुरू आहे. येथील दुरवस्थेची आम्ही पाहणी केली आहे. वरच्या कार्यालयात दुरूस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती संरक्षण सहाय्यक शैलेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था
By admin | Updated: October 9, 2015 23:55 IST