वसई : गणेशाचे विसर्जन होऊन २ दिवस झाल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप आजही रस्त्यांमध्ये दिमाखात उभे आहेत. वास्तविक विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी हे मंडप हटवण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी संबंधीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्यामुळे आजही अनेक मंडप भर रस्त्यात उभे आहेत.वसई विरारमध्ये भर रस्त्यात मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात परवानग्या दिल्या जातात परंतु गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर हे मंडप हटवण्याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करीत आले आहेत. विसर्जनानंतरही स्थानिक नागरीकांना हे अडथळे पार करत मार्गक्रमण करावे लागत आहे. विसर्जनाच्या दिवशी तर गणेशोत्सव मंडळाचे उत्साही कार्यकर्ते सरसकट रस्तेच बंद करीत असतात. अशा मंडपामुळे नागरीकांना ११ दिवस एकदिशा मार्गाने ये-जा करावी लागत असते. वास्तविक यावर पोलीस यंत्रणेने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
बाप्पांचे विसर्जन झाले; रस्त्यातील मंडपांचे काय?
By admin | Updated: September 29, 2015 23:47 IST